चंदननगरमध्ये वसाहतीत आग   

पुणे : नगर रस्त्यावरील चंदननगर भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत बुधवारी पहाटे आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच रहिवासी बाहेर पळाल्याने गंभीर दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर १० गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घबराट उडाली. आगीत ५० पेक्षा जास्त झोपड्या जळाल्याची माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.
 
चंदननगर भागात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत आहे. या वसाहतीत कष्टकरी मोठ्या संख्येने राहायला आहेत. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास वसाहतीतील झोपड्यांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील नियंत्रण कक्षाला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १५ बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. आग भडकल्यानंतर वसाहतीतील नागरिक बाहेर पळाल्याने गंभीर दुर्घटना टळली. झोपड्यांमधील दहा गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली. स्फोटाच्या आवााजमुळे घबराट उडाली.
 
अग्निशमन दलाचे केंदप्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ८० जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. आगीत झोपड्यांमधील गृहोपयोगी वस्तू जळाल्या. डोळ्यादेखत संसार जळाल्याने अनेकांना दु:ख अनावर झाले.जवानांनी शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले असून, आगीत कोणी जखमी झाले नाही. जवानांनी झोपड्यांमधून १०० पेक्षा जास्त सिलिंडर बाहेर काढले. सिलिंडर बाहेर काढल्याने गंभीर दुर्घटना टळली. 

देवेंद्र पोटफोडे, अग्निशमन दल प्रमुख

शिवाजी रस्त्यावरील लाकडी वाड्याला आग

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराशेजारी असलेल्या जुन्या लाकडी वाड्याला मध्यरात्री एकच्या सुमारास आग लागली. लाकडी वाडा पेटल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले. आग भडकल्यानंतर शेजारी असलेल्या काका हलवाई मिठाईच्या दुकानातून जवानांनी प्रवेश करून इमारतीतून पाण्याचा मारा केला. लाकडी वाड्याच्या तळमजल्यावर दोन दुकानांनी आगीच झळ पाेहोचली.
 

Related Articles